Bike taxi ban Maharashtra: राज्यात बाइक टॅक्सीला ‘ब्रेक’! ओला-उबर-रॅपिडो सेवांवर तात्पुरती बंदी; नियम मोडल्याचा सरकारचा ठपका

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मार्च २०२६ ।। राज्यात झपाट्याने लोकप्रिय झालेल्या बाइक टॅक्सी सेवांना महाराष्ट्र सरकारने अचानक ब्रेक लावला आहे. ओला, उबर आणि रॅपिडो या अॅप-आधारित कंपन्यांच्या बाइक टॅक्सी सेवांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून त्यांना देण्यात आलेले अस्थायी परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये सुरू असलेली ही सेवा सध्या थांबली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो चालक आणि रोजच्या प्रवासासाठी बाइक टॅक्सीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात बाइक टॅक्सी सुरू करण्यासाठी कंपन्यांना फक्त इलेक्ट्रिक बाइक वापरण्याची स्पष्ट अट घालण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकचा वापर सुरू असल्याचे आढळून आले. हा नियमभंग मानत सरकारने कारवाईचा बडगा उगारला. मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. तरीही नियमांची पूर्तता न झाल्याने सरकारने त्यांचे अस्थायी परवाने रद्द केले. मात्र कंपन्यांना अटी पूर्ण करण्यासाठी आणखी एक महिन्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारने स्पष्ट इशारा देत राज्यात पेट्रोलवर चालणारी कोणतीही बाइक टॅक्सी आढळल्यास चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करून वाहन जप्त केले जाईल, असे सांगितले आहे. पर्यावरणपूरक वाहतूक वाढवणे आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा ई-बाइक टॅक्सीचा मूळ उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आता कंपन्या सरकारच्या अटी पूर्ण करून पुन्हा सेवा सुरू करतात की महाराष्ट्रात बाइक टॅक्सीचा अध्यायच बंद होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *