![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मार्च २०२६ ।। मार्च महिना नुकताच सुरू झाला असला तरी राज्यात उन्हाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण ते मुंबईपर्यंत उष्ण वाऱ्यांनी वातावरण तापवले असून दिवस असो की रात्र, उकाडा कमी व्हायची चिन्हे दिसत नाहीत. पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विशेषत: मुंबई आणि ठाणे परिसरात उष्णतेची लाट जाणवत आहे. दुपारची वेळ तर अक्षरशः भट्टीसारखी होत असून सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान बाहेर पडणाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारीही ही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमान ३८ ते ३९ अंशांच्या दरम्यान जाण्याचा अंदाज असून ठाण्यात पारा थेट ४१ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. राज्यातील अनेक शहरांत तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. अकोल्यात ४० अंश, सोलापुरात ३९.४, सांगलीत ३८.२, पुण्यात ३७.७ तर कोल्हापुरात ३७ अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अशी स्थिती निर्माण झाल्याने पुढील एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची तीव्रता किती वाढेल याचीच चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राजस्थान आणि गुजरात परिसरात तयार झालेल्या अँटीसायक्लोनमुळे महाराष्ट्राकडे उष्ण वारे येत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके सुती कपडे वापरावेत आणि प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. लिंबूपाणी, ताक, लस्सी किंवा ओआरएससारख्या पेयांचे सेवन करून शरीरातील पाण्याची पातळी कायम ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
