![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजमितीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांमध्ये १७.३७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ ‘टीएमसी’ पाणीसाठा अधिक जमा झाल्याची जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात चार मिलिमीटर, पानशेतमध्ये २९ मिमी, वरसगावमध्ये २७ आणि टेमघरमध्ये ४३ मिमी पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी धरणासह घाटमाथ्यावर पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला प्रकल्पातून विसर्ग करण्यास सुरुवात केली होती. आता हा विसर्ग कमी करण्यात आला आहे. जून महिन्यापासून झालेल्या पावसामुळे आतापर्यंत ३.७७ टीएमसी पाणी धरणातून सोडले आहे. खडकवासला प्रकल्पात १७.३७ टीएमसी (५९.५८ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४.८५ टीएमसी (१६.६२टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टीएमसी पाणी अतिरिक्त जमा झाले आहे.
जिल्ह्यातील पातळी वाढली
पुणे जिल्ह्यातील कळमोडी आणि नाझरे धरण जून महिन्यातच शंभर टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील उर्वरित धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड, येडगाव धरणात ७२ टक्क्यांपेक्षा अधिक साठा जमा झाला आहे. ‘टाटां’च्या विविध धरणांत ६३.८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पवनामध्ये ६९ टक्के आणि भामा आसखेडमध्ये ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
उजनी धरण ७५ टक्के भरले
सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला. सातत्याने होणाऱ्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातून विसर्ग करण्यात आला. उजनी धरणातील पाणी पातळी वाढल्याने धरणातून पहिल्यांदाच जूनमध्ये पाणी सोडण्यात आले. उजनीमध्ये आजमितीला ४०.१७ टीएमसी म्हणजेच ७४.९८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात उणे २१.६७ टीएमसी (- ४०.७५ टक्के) मृत पाणीसाठा शिल्लक होता.
