महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ जुलै ।। महेंद्रसिंह धोनी ७ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश संपादन केले आहे. तो भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कर्णधार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२० मध्ये निवृत्तीची घोषणा केली. पण असे असले तरी त्याने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले आहे.
धोनीने डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००७ साली तो पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार झाला.
त्याच्या काहीच वर्षात त्याच्यावर वनडे आणि कसोटी कर्णधारपदाचीही जबाबदारी आली. त्याने या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडताना भारताला मोठे विजय मिळवून दिले. त्याने आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सांभाळताना ५ वेळा विजेतेपद जिंकले.
त्याच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या आकडेवारीचा आढावा घेऊ.
सर्वात जास्त ६० कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षक असणारा कर्णधार
वनडेत एकाच डावात यष्टीरक्षक म्हणून ६ बळी
सर्वाधिक २०० वनडे सामन्यांमध्ये यष्टीरक्षक असणारा एकमेव कर्णधार
वनडेतील एकाच डावात ३ स्टंपिंग.
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत एका डावात यष्टीरक्षक म्हणून ५ बळी
सर्वात जास्त ७२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत यष्टीरक्षक असणारा कर्णधार.
आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत सर्वात जास्त ३४ स्टंपिंग.
कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त १९५ स्टंपिंग
कर्णधार म्हणून अशी आकडेवारी
भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून एकून ६० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये २८ सामने जिंकले, तर १८ गमावले. तसेच १५ सामने अनिर्णित राहिले.
याशिवाय वनडेत २०० सामन्यांत कर्णधार म्हणून खेळला असून, ज्यात भारतीय संघाने ११० सामने जिंकले, तर ७४ गमावले. त्याचबरोबर ५ सामने बरोबरीत सुटले, तर ११ सामन्यांचा निकाल लागला नाही.
तसेच, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ सामन्यात ४२ सामने जिंकले, तर २८ गमावले. तसेच १ सामना बरोबरीत सुटला आणि २ सामन्यांचा निकाल लागला नाही.