महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुलै ।। राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
6 ते 8 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार असून, एकूण 10 माध्यमांतील विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची चाचणी घेतली जाईल. विद्या प्राधिकरणाचे संचालक राहुल रेखावार यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले. (Latest Pune News)
विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे की नाही याची पडताळणी करून अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे मदत होईल. तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणीमध्ये 6 ते 8 ऑगस्टदरम्यान पायाभूत चाचणी, ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर पहिला आठवडा या दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी 1, तर एप्रिल 2026 मध्ये संकलित मूल्यमापन चाचणी 2 घेतली जाणार आहे.
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता पाळणे आवश्यक
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी. प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत, पावसाने भिजणार नाहीत, सुरक्षित राहतील, तालुका समन्वयकांनी प्रश्नपत्रिका छायांकित प्रती काढण्यासाठी बाहेर जाणार नाहीत, प्रश्नपत्रिकांचा मोबाइलमध्ये फोटो काढणे, समाजमाध्यमांद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.