महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुलै ।। नागपूर शहरात वाढत्या अपघातांचे प्रमाण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतीला धावून आली आहे. महानगरपालिकेने ‘स्मार्ट नागपूर’ उपक्रमाअंतर्गत एआय आधारित ‘इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयआयटीएमएस) अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे.
या प्रणालीमुळे वाहतूक सिग्नल पूर्णतः स्वयंचलित होणार असून, बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. वाहन क्रमांक स्वयंचलितपणे स्कॅन करून स्पीड व्हॉयलेशन, रेड सिग्नल जम्पिंग, रॉंग साइड ड्रायव्हिंग, सीट बेल्ट न लावणे यासारख्या नियमभंगांवर तात्काळ कारवाई होणार आहे. यामाध्यमातून एआयच्या मदतीने थेट चालान पाठवले जाणार आहे.
पोलिस विभागाकडे संचालनाची जबाबदारी
ही संपूर्ण यंत्रणा शहरभरात कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेकडून तिचे संचालन पोलिस विभागाकडे सोपवले जाईल. यामुळे वाहतुकीत शिस्त येईल, नियमभंग रोखले जातील आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
वेगात वाढ, वेळेची बचत
या स्मार्ट ट्राफिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सिग्नल वाहनांच्या गर्दीनुसार आपोआप नियंत्रित होणार. ज्या दिशेला वाहनांची संख्या अधिक असेल, त्या दिशेचा सिग्नल जास्त वेळ हिरवा राहील. त्यामुळे प्रवासाचा वेळ २८ ते ४८ टक्क्यांनी कमी होईल आणि प्रवासाचा वेग सुमारे ६२ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे.
१० सिग्नलवर यंत्रणा कार्यरत, १५ ठिकाणी काम सुरू
सध्या दीक्षाभूमी, शंकरनगर, बजाजनगर, अभ्यंकरनगर, एलएडी कॉलेज, अलंकार चौक, लक्ष्मीनगर, काचीपुरा, श्रद्धानंदपेठ आणि अजित बेकरी या १० ठिकाणी ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. पुढील टप्प्यात आणखी १५ ठिकाणी काम सुरू असून, मार्च २०२६ पर्यंत शहरातील सर्व १७१ सिग्नल या प्रणालीशी जोडण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे.