महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। सबिना पार्क इथे झालेल्या डे नाईट कसोटीत यजमान वेस्ट इंडिजवर २७ धावांतच बाद होण्याची नामुष्की ओढवली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातली ही दुसरी नीचांकी धावसंख्या आहे. विजयासाठी २०४ धावांचं लक्ष्य मिळालेल्या वेस्ट इंडिजने १४.३ षटकातच शरणागती पत्करली आणि ऑस्ट्रेलियाने १७६ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असं निर्भेळ यश मिळवलं.
मिचेल स्टार्कने १०० कसोटीत गाठला ४०० विकेट्सचा टप्पा
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने १००व्या कसोटीत ४०० विकेट्सचा टप्पा गाठला. स्टार्कने दुसऱ्या डावात पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या डावाला खिंडार पाडलं. स्टार्कने सगळ्यात कमी वेळात पाच विकेट्स पटकवण्याची करामत केली. स्टार्कने ७.३ षटकात ९ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स घेतल्या. नॅथन लॉयनच्या जागी संधी मिळालेल्या बोलँडने हॅटट्रिक घेत निवड योग्य ठरवली. बोलॅंडने जस्टीन ग्रीव्हज, शामर जोसेफ आणि जोमेल वॉरिकन यांना बाद करत खास विक्रम नावावर केला.
Six wickets for Mitchell Starc. Seven ducks for West Indies. 27 all out at Sabina Park. https://t.co/PatprCcQ6P #WIvAUS pic.twitter.com/I4fl9qN66w
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 14, 2025
स्टार्क ठरला सामनावीर
दोन कसोटी जिंकत मालिका आधीच नावावर करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यातही वर्चस्व कायम राखलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २२५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजचा डाव १४३ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १२१ धावाच करता आल्या. अल्झारी जोसेफने ५ तर शामर जोसेफने ४ विकेट्स घेतल्या. चौथ्या डावात वेस्ट इंडिजने जराही प्रतिकार न करता शरणागती पत्करली.१००व्या सामन्यात ७ तसंच एकूण १५ विकेट्स पटकावणाऱ्या स्टार्कला सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.