महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। खासगी हवामान संस्था स्कायमेट (Skymet) च्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्याची ही प्रणाली जसजशी उत्तर पश्चिमेला वळेल तसतसा उत्तरेकडील राज्यांमध्येसुद्धा पाऊस वाढताना दिसेल. ज्यामुळं 16 ते 17 जुलैदरम्यान उत्तरिय राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राजस्थानचा पूर्व भाग आणि त्याला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल आणि हाच पाऊस धीम्या गतीनं पश्चिमेकडे सरकताना दिसेल.
सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि नजीकच्या भागांवर कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं देशभरात कमीजास्त प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आता पावसानं उसंत घेतली असल्या कारणानं ऊन- सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे. कोकणातही मागील कैक दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असून आकाश निरभ्र झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कोकणात पाऊस विसावला
राज्यात कोकणात पाऊस विसावला असला तरीही विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मात्र त्याचा जोर वाढताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार पावसाच्या धर्तीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये मात्र ताशी 30 ते 40 किमी वेगाच्या वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजानुसार शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळेल. तर, अधूनमधून शहरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात तापमान कमाल 30 अंश आणि किमान 25 अंश सेल्सिअसदरम्यान राहील आणि आर्द्रतेचं प्रमाण मात्र जास्त असेल.
देश स्तरावरील पावसाचा अंदाज…
जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टीस्तान, सौराष्ट्र आणि कच्छसह आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाह, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूतील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देत नागरिक आणि प्रशासनाला आयएमडीनं सतर्क केलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, केरळ, लक्षद्वीप आणि अंदमान निरोबार बेट समुहांवरही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.