महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारताकडून रवींद्र जडेजा शेवटपर्यंत उभा राहिला. पण त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. शेवटी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने त्याला साथ दिली. पण भारतीय संघ विजय मिळवू शकलेला नाही. हा सामना भारतीय संघाला २२ धावांनी गमवावा लागला आहे.यासह पराभवासह भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. दरम्यान काय आहेत या पराभवाची प्रमुख कारणं? जाणून घ्या.
पहिल्या डावात आघाडी न घेणं
या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना भारताने इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर संपुष्टात आणला. गोलंदाजांनी आपलं काम योग्यरित्या पूर्ण केलं. पण फलंदाजांना आपलं काम करता आलं नाही. भारताकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने शतकी खेळी केली. शेवटी ऋषभ पंतने ७४ आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांची खेळी केली. या डावात भारतीय संघाकडे आघाडी घेण्याची संधी होती. पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर उभा राहिला पण त्याला इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. एका पाठोपाठ एक विकेट्स गेल्याने भारतीय संघाचा डाव ३८७ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने आघाडी घेण्याची संधी गमावली.
फलंदाजांचा फ्लॉप शो
भारतीय संघातील फलंदाज या मालिकेत चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. प्रमुख फलंदाजांमध्ये करूण नायरला वगळलं, तर सर्वांच्याच नावे शतक झळकावण्याची नोंद आहे. मात्र, या डावात एकही फलंदाज टिचून फलंदाजी करू शकलेला नाही. यशस्वी जैस्वालने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर नको तो फटका मारून आपली विकेट फेकली. त्यानंतर करूण नायर १४,शुबमन गिल ६, आकाशदीप १, ऋषभ पंत ९, वॉशिंग्टन सुंदर ०, नितीश कुमार रेड्डी १३ धावांवर माघारी परतले.
रवींद्र जडेजाला साथ न मिळणं
रवींद्र जडेजाने या डावात १८१ चेंडूंचा सामना करत नाबाद ६१ धावांची खेळी केली. जडेजा शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहिला. भारतीय संघाला विजयासाठी खूप कमी धावा शिल्लक होत्या. एकेरी दुहेरी धाव घेण्याची संधी होती. पण अनेकदा जडेजाने धाव घेणं टाळळं. जर वॉशिंग्टन सुंदर किंवा नितीश कुमार रेड्डीने जडेजाला साथ दिली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.