महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र अचानक या लाल फळाचे दर वाढण्यामागे नेमकी काय कारणं आहेत याबद्दल ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था आहे. रक्ताच्या वाढीसाठी लाल रंगाची फळं आणि भाज्या उत्तम असतात असं आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगतात. मात्र आता डाळिंबाचे दर अचानक वाढले असून एका डाळिंबाच्या किंमतीत सहा ते सात वडापाव येतील एवढी या फळाची किंमत वाढली आहे. मोठ्या डाळिंबं एक किलो घेतली तर त्यामध्ये जवळपास एक डझन वडापाव घेता येईतील, एवढे दर वाढल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या दरवाढीमागील कारणं काय आहेत ते समजून घेऊयात…
डाळिंबाची किंमत का वाढली?
मागणी आणि पुरवठा तत्वावर फळांची आणि भाज्यांची किंमत ठरते. सध्या डाळिंबाला चांगली मागणी असली तरी तितकासा पुरवठा होत नाहीये. उन्हाळा आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे यंदा डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याची आवक घटल्याने किमतीत वाढ झाली आहे. जुलै उजाडला तरी मुंबईत सलग पाऊस झालेला नाही. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. परिणामी, डाळिंबासारख्या फळांची मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा नसल्याने त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.
केवळ खाण्यासाठी नाही तर…
डाळिंबाच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. दुसरीकडे डाळिंब आरोग्यदायी असल्याने ग्राहक ते जादा पैसे मोजून विकत घेताना दिसत आहेत. सलाड, टॉपिंग्स, ज्यूससाठीही मोठ्या प्रमाणात डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाचे दाणे काढून खाण्यासह विविध सलाड तसेच टॉपिंग्स म्हणून त्याचा वापर केला जातो. डाळिंबाचा रस पिण्याकडेही अनेकांचा कल असतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करा; या लोकांना डाळिंब खाऊ नये
डाळिंब आरोग्यदायी असलं तरी नियमितपणे त्याचं सेवन करण्याआधी डॉक्टरांच्या सल्ला घेण्याचं सुचवलं जातं. मूत्रपिंडाचा आजार किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या पोटॅशियम आणि साखरेच्या प्रमाणामुळे डाळिंब कमी प्रमाणात सेवन करणं फायद्याचं ठरतं. तसेच रक्त पातळ होणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डाळिंबाचं सेवन डॉक्टरांना विचारून करावे, असे तज्ज्ञ सांगतात.
डाळिंबाचे सध्याचे दर किती?
डाळिंबाची सध्याची किंमत किती- साधारण आकाराची डाळिंबं 80 ते 120 रुपये किलो दराने मिळतात. गावठी डाळिंबांसाठी प्रति किलो 150 ते 200 रुपये मोजावे लागतात. तर मोठ्या आकाराच्या डाळिंबांसाठी 180 ते 200 रुपये प्रति किलो असा दर आहे. म्हणजेच 15 रुपयाचा एक वडापाव या दराने हिशेब लावल्यास मोठ्या आकाराची 3 डाळिंबं घेण्यासाठी जितके पैसे द्यावे लागतात तेवढ्यात 1 डझन वडापाव घेता येतील.
डाळिंबाचे आरोग्यदायी फायदे
पचनशक्ती सुधारते: डाळिंबातील फायबरचे प्रमाण पचनास फायदेशीर ठरते. त्यामुळे बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते.
मेंदूचे आरोग्य : डाळिंब मेंदूतील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून स्मृती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारू शकते.
हृदयरोगापासून संरक्षण : प्युनिकॅलाजिन्स आणि अँथोसायनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स डाळिंबामध्ये विपुल प्रमाणात आहेत. यामुळे शरीरामधील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. रक्तदाब कमी करून हृदयरोगापासून संरक्षण करण्यास हे घटक मदत करू शकतात.
अँटीऑक्सिडंट पॉवर : डाळिंबामध्ये पॉलिफेनॉलसह उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट्स असून, ते मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. परिणामी, दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो.
कर्करोग प्रतिबंध : डाळिंबातील अँटीऑक्सिडंट व दाहक-विरोधी संयुगे प्रोस्टेट आणि स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध उत्तमरित्या काम करतात.