पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव टँकरने सहा जणांना उडवले ;दोघांची प्रकृती चिंताजनक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – दि. ३१ ऑगस्ट – पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवडमधील जुनी सांगवी परिसरात भरधाव टँकरने सहा जणांना भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. यात, दोघांची प्रकृती चिंताजनक असून इतर जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने यात मोठी जीवितहानी झालेली नाही.

या घटनेप्रकरणी राधेश्याम बब्रुवान मुळे वय- 26 रा. आनंदनगर जुनी सांगवी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला. त्याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल टँकर क्रमांक (एम.एच-14 एच.यू- 6872) हा सांगवी फाटा येथून माकन चौक जुनी सांगवीच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. तेव्हा, टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या, रस्त्याने चालत जात असलेल्या व्यक्तींना त्याने भीषण धडक दिली. त्यानंतर टँकर एका इलेक्ट्रिक खांबाला जावून ध़डकला. त्यानंतर टँकर चालकाने घटनस्थळावरून पळ काढला.

या अपघातात सहा जणांना धडक दिली असून सध्या चार जणांची ओळख पटली आहे. त्यातील, दोघांची प्रकृती गंभीर असून इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *