महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – सुनील आढाव – दि. ३१ ऑगस्ट – सातारा – कास पठार येथे एक दोन नव्हे तर असंख्य रानफुलांच्या रंग सोहळ्यात कास पठार न्हाऊन निघायला सुरूवात झाली आहे. सध्या 30 ते 40 प्रजातीच्या रानफुलांनी निसर्ग सौंदर्यात आणखी भर घातली आहे. दरम्यान, कासवरील विविध रंगीबेरंगी फुलांचा नजराणा पाहण्यास कोरोनाचा अडसर येणार आहे. त्यामुळे यावर्षी कासवरील विविध रंगी फुलांच्या रंगछटा पाहावयास देश विदेशातील पर्यटकांच्या गर्दीला मर्यादा आल्या आहेत.
पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचे नामांकन मिळाले आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेले कास पठार आता विविध रंगी रानफुलांनी बहरू लागले आहे. माळरानावर बहरलेले रानफुलांच्या ताटव्यांचे मनोहारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करुलागले आहे. त्यामुळे फुलांच्या बहराबरोबर पर्यटनाला बहर येणार असून जिल्ह्यासह देश विदेशातील पर्यटकांची पावले आता कास पठाराच्या दिशेने पडू लागणार आहेत मात्र त्याला कोरोनामुळे मर्यादा येणार आहेत.
सध्या कास पठारावर जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या व पांढर्या रंगाची फुले पर्यटकांची आकर्षण ठरू लागली आहेत. सध्या आहे असेच जर ऊन राहिले तर पठारावर विविध प्रकारच्या रानफुलांच्या रंगछटा लवकरच पाहावयास मिळणार आहेत. कास पठारावर विविध रंगी फुले फुलू लागली असली तरी अद्यापही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांना बंदी आहे. त्यामुळे कास पठार कार्यकारी समितीने हंगामाचे काहीही नियोजन केलेले नाही. यावर्षी कासच्या फुलांच्या हंगामाबाबत अद्यापही प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी जुलै महिन्यापासून कास पठारावरील हंगामाचे नियोजन सुरू असते. तसेच समिती व वनविभागाची संयुक्त बैठकही होत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठकही झालेली नाही. तसेच वनविभागाने काही मार्गदर्शक सूचनाही केलेल्या नाहीत. यामुळे कासचा हंगाम तळ्यात मळ्यातच राहणार आहे. त्यामुळे यावर्षी पर्यटक कासच्या विविध रंगी फुलांना मुकणार असल्याचेच चित्र यावर्षी तरी स्पष्ट होत आहे.
कास हंगामातील व्यवसायावर परिणाम…
कास पठारावरील फुलांचा रंग सोहळा म्हणजे अन्य व्यावसायिकांचा अर्थाजनाचा हा सोहळा असतो. त्यामुळे राज्यासह देशविदेशातील पर्यटक येथे पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे कास पठार परिसरासह सातारा शहरातील हॉटेल, लॉजिंग बुक करत असतात. यामुळे हॉटेलसह अन्य व्यवसायांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र यावर्षी कास पठारावर अवलंबून असणार्या व्यवसायावर कोरोनामुळे पाणी फिरले आहे. शासनाने अद्याप पर्यटनावर बंदी घातली आहे. त्याचा परिणाम कासच्या पर्यटनावर होणार आहे. त्यामुळे यावर्षी कासच्या रंगछटावरती कोरोनाचे संकट घोंगावत राहणार आहे.