महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात पावसाने थैमान घातले असून चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काही जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.संभाव्य पूरस्थिती आणि नद्या-नाल्यांमध्ये पाण्याची वाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, भंडारा, चंद्रपूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, गडचिरोलीला रेड अलर्ट.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; पालघर, नाशिक, अमरावती, हिंगोली, नांदेडला येलो अलर्ट.
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून सक्रिय.