![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। आषाढ महिन्याला निरोप देताच श्रावण सरींनी मुंबई महानगर प्रदेशात (MMR) जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करत असली तरी, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
श्रावणाच्या सुरुवातीलाच पावसाने मुंबई महानगर प्रदेशात आपली ताकद दाखवली आहे. हवामान खात्याने पुढील काही तास सतर्कतेचा इशारा दिला असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज असली तरी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवलीत पावसाची तुफान बॅटिंग
रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-डोंबिवली शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले असून, गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांवरून प्रशासनाने केलेले दावे या पहिल्याच मोठ्या पावसात फोल ठरल्याची टीका नागरिक करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने सोशल मीडियावर नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, केडीएमसीच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने काही भागांत पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम सुरू केले असून, नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे
नवी मुंबईतही पावसाचा जोर; वाहतुकीवर परिणाम
नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली. बेलापूर, वाशी, खारघर, नेरूळ आणि कोपरखैरणे यांसारख्या प्रमुख भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस बरसत आहे. यामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहे. सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. तर नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांकडून पाहणी केली जात असून, प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
सकाळी ८:३० पर्यंत प्रमुख शहरांमधील माथेरान: १४४ मिमी महाबळेश्वर: १४०.४ मिमी बेलापूर: ३५ मिमी अलिबाग: ३० मिमी सांताक्रूझ: २४ मिमी कुलाबा: २३ मिमी रत्नागिरी: १ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.
