महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुलै ।। राज्यभरात पावसाने जोरदार पुनरागमन करत सर्वदूर झोडपून काढले आहे. अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी त्याचा विपरीत परिणामही जाणवू लागला आहे. पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून रायगडसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी मुंबईत अविरत पावसाची नोंद झाली असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहरात सरासरी ६.८० मिमी, पूर्व उपनगरात ११.५३ मिमी, तर पश्चिम उपनगरात ७.४२ मिमी पावसाची नोंद झाली.
आज रायगड जिल्हा, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. वाशीम, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ वातावरणासह हलकासा पाऊस होण्याची शक्यता असून, महिन्याच्या अखेरीपर्यंत पावसाचा हा जोर कायम राहण्याची चिन्हं हवामान विभागाने स्पष्ट केली आहेत.