इंग्लंडच्या रडीच्या डावानंतर गिलने बेन स्ट्रोकची ‘ती’ ऑफर का नाकारली स्वत: सांगितलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामना अनिर्णित राहिला. मात्र हा सामना संपण्याआधी मैदानात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी नवीन वादाला तोंड फुटलं. शेवटच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चिवट फलंदाजी केल्याने इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेला विजय अनिर्णित सामन्यात बदलला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतके झळकावल्यानंतर भारताने सामना अनिर्णित सोडण्यावर सहमती दर्शवली. भारताच्या या कामगिरीमुळे इंग्लंडला मालिका जिंकता आलेली नाही. शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रातील खेळ सुरु होण्याआधी इंग्लिश कर्णधार बेन स्ट्रोक्सने भारतीय फलंदाज शतकांच्या उंबरठ्यावर असताना सामना अनिर्णित सोडण्याची ऑफर दिली. मात्र भारतीय फलंदाजांनी ती नाकारल्याने स्ट्रोक्स जे काही बोलला आणि जसे इंग्लिश खेळाडू वागले त्यावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

सामन्यात घडलं काय?
सामना अनिर्णित अवस्थेत राहणार हे स्पष्ट झालेलं असताना शेवटच्या सत्रात भारतीय संघ 386 वर चार गडी बाद अशा स्थितीत 75 धावांनी आघाडीवर होता. त्याचवेळी अचानक स्टोक्स भारतीय फलंदाजांकडे आला, जडेजा आणि सुंदर यांनी सामना अनिर्णित राहणार असल्याने शेवटच्या सत्रात न खेळण्याची ऑफर दिली. शतकांच्या जवळ असलेल्या भारतीय जोडीने नम्रपणे ही ऑफर नाकारली. मात्र हा नकार स्टोक्स आणि इतर इंग्लिश खेळाडूंना पचला नाही. त्यानंतर बेन स्ट्रोक्सची जडेजाशी बाचाबाची झाली. जडेजा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यामुळेच इंग्लंडच्या कर्णधाराने निराश झाल्यासारखं डोकं हलवलं आणि तो फिल्डींग करण्यासाठी निघून गेला. हा राडा झाला तेव्हा जडेजा 89 तर सुंदर 80 धावांवर खेळत होते. त्यानंतर पुढील पाच ओव्हरमध्ये दोघांनी आपआपली शतकं झळकावली आणि नंतर भारतानेही सामना सोडण्यास होकार दर्शवला.

या गोंधळावर गिल काय म्हणाला?
सामन्यानंतर या सर्व गोंधळाबद्दल बोलताना, भारताचा कर्णधार शुभमन गिलने आपलं मत मांडलं आहे. मँचेस्टरमधील कसोटीच्या शेवटच्या काही मिनिटांत झालेल्या तणावावर बोलताना गिलने स्पष्ट केले की, अशावेळी पुढे जाण्याचा निर्णय पूर्णपणे फलंदाजांनी घ्यायचा यावर आम्ही ठाम होतो. “हे त्या दोघांवर अवलंबून होते. मला वाटले की त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली, दोघेही 90 च्या दशकात होते आणि दोघेही त्यांच्या शतकांना पात्र होते,” गिल पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हणाला. त्यामुळेच संघ जडेजा आणि सुंदरच्या पाठिशी उभा राहिला असं गिलने अधोरेखित केलं.

भारताचे दमदार कमबॅक
हा एक क्षण होता जेव्हा भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात शून्य धावांवर दोन गडी बाद अशी होती. 311 धावांनी पिछाडीवर असताना, भारताला सामन्यात तसेच मालिकेत टिकून राहण्यासाठी पाच सत्रं फलंदाजी करावी लागली. गिलच्या मालिकेतील चौथे शतक झळकावलं. त्याने 228 बॉलमध्ये 103 धावा केल्या. के. एल. राहुलनेही 90 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. जडेजा आणि सुंदरच्या नाबाद 203 धावांच्या भागीदारीने इंग्लिश आक्रमणाला धक्का दिला आणि मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताला थोडा दिलासा दिला आहे.

इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्या पण…
इंग्लंडने यापूर्वी 669 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या इंग्लंडच्या कसोटी इतिहासातील पाचवी सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंड हा सामना जिंकून मालिका 3-1 ने एक सामना शिल्लक असतानाच खिशात घालण्याच्या तयारीत होता. भारतीय संघाच्या चिवट फलंदाजीचा किल्ला भेदण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना अपयश आले. कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमान संघाला फक्त दोन विकेट मिळाल्या. मालिका आता 2-1 अशी असल्याने गुरुवारपासून सुरू होणारा ओव्हल येथे होणारा शेवटचा कसोटी सामना निर्णायक ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *