महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। महागाई सर्वसामान्यांची पाठ काही सोडत नाही. काही महिन्यांपासून टोमॅटो व इतर भाज्यांच्या दरात सतत वाढ होत असताना ऐन सणासुदीत तूरडाळ, कडधान्य, खाद्य तेल आणि साखर महागली आहे. सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीचा दरही वाढला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
२०२५ मध्ये हरभरा उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. त्यामुळे किंमती स्थिर राहतील, असे बोलले जात होते. मात्र, गेल्या दहा दिवसांत हरभरा डाळीच्या दरात प्रतिकिलो सात रुपयांची वाढ झाली आहे.
त्यामुळे घाऊक बाजारात ६६ रुपये किलो असलेली हरभरा डाळ ७४ रुपयांवर गेली आहे. याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये वाढलेला देशांतर्गत वापर, चणा डाळ आणि हरभरा पीठ उद्योगाकडून सतत होणारी मागणी आणि कमी झालेले उत्पादन यांचा समावेश आहे. परंतु सरकारी हस्तक्षेप आणि वाढत्या उत्पादनामुळे किमती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकारने जुलैसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा कोटा एक लाख टनाने कमी आहे. त्याचा फटका बाजाराला बसला असून प्रतिकिलो ५० पैशांनी साखरेचे दर वाढले आहे. पुढील हंगाम सुरू होतपर्यंत काटकसरीचे धोरण सरकारने अवलंबले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या महिन्याचा साखरेचा कोटा कमी केला आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
देशात खाद्यतेलाची आयात गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. बंदरांवरील अनियमितता आणि जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे ही घसरण झाल्याचे मानले जाते. कांडला बंदरात मोठ्या प्रमाणात जहाजांची गर्दी झाली आहे. परदेशातून खाद्यतेल घेऊन जाणाऱ्या जहाजांमधून माल उतरवण्यास बराच वेळ लागत आहे. त्यामुळे बाजारपेठेत खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सोयाबीनसह सरसोच्या तेलात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.