ट्रम्प टॅरिफ बॉम्ब फोडणार ! भारत चांगला मित्र पण टॅरिफ द्यावा लागणारच, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे मोठे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (29 जुलै) एक मोठे विधान केले की, भारतावर 20 ते 25 % पर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लादले जाऊ शकते. यावर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सनुसार अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, भारत एक चांगला मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून भारताने अनेक देशांच्या तुलनेत अमेरिकन वस्तूंवर सर्वाधिक शुल्क लावले आहेत. ते म्हणाले की,भारताने आतापर्यंत जवळजवळ सर्वाधिक शुल्क आकारले आहे.

भारतासह अनेक देश अमेरिकेसोबत व्यापार करार अंतिम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सहाव्या फेरीच्या बैठकीसाठी अमेरिकन टीम पुढील महिन्यात भारतात दाखल होणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही देशांमधील प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील पुढील फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकेचे पथक 25 ऑगस्टला हिंदुस्थानला भेट देणार आहे.

काही क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरुन मतभेद आहेत. विशेषतः कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ क्षेत्रात, भारताने आपल्या भूमिकेशी तडजोड केलेली नाही. भारत आजही अनुवांशिकरित्या सुधारित पिकांच्या (जसे की सोयाबीन आणि मका) आयातीला विरोध करतो आणि देशांतर्गत दुग्ध बाजारपेठ परदेशी कंपन्यांसाठी उघडू इच्छित नाही.

ट्रम्प यांनी जगभरातील देशांना इशारा दिला होता की, अमेरिका स्वतंत्र व्यापार करार न केलेल्या देशांकडून 15 ते 20 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आकारू शकते. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी नुकतेच सांगितले की, अमेरिकेला भारतासोबत वाटाघाटी करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे जेणेकरून ते अमेरिकन निर्यातीसाठी आपला बाजार आणखी खुला करण्यास तयार आहेत की नाही हे ठरवू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *