महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी २०० हून अधिक गणेश मंडळांनी या वर्षीची विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता लक्ष्मी रस्त्यावरून सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. मध्य भागातील गणेश मंडळांच्या बैठकीत मानाचे गणपती, महत्त्वाचे गणपती, पूर्व भागातील गर्दी, प्रमुख रस्त्यांच्या अडचणी, प्रशासनाच्या भूमिकेसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
अकरा मारुती मंडळाचे राजेंद्र देशमुख म्हणाले, ‘‘दोनशेहून अधिक मंडळांनी एकत्र येत सकाळी सातला विसर्जन मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे पुणेकरांसाठी समाधानाचे पाऊल आहे.’’
आनंद सागर म्हणाले, ‘‘सर्व गणपती समान आहेत. कोणताही गणपती मोठा किंवा लहान नाही. म्हणूनच एकत्रित आणि शांततेत मिरवणूक पार पडावी, हे आपले कर्तव्य आहे.’’
गणेश भोकरे म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे परंपरेनुसार मानाचे पाच व लक्ष्मी रस्त्याचे पाच गणपती संध्याकाळी मार्गस्थ होतात. काही मंडळे स्वतः वेळ जाहीर करत असल्यास त्याचा आम्ही निषेध करू.’’
राहुल आडमाळकर म्हणाले, ‘‘प्रशासनच वेळापत्रक ठरवते. मंडळांनी स्वतंत्र वेळा ठरवल्यास विसंगती निर्माण होते. एकत्र येऊन प्रशासनावर दबाव आणून योग्य वेळा निश्चित कराव्यात.” रामेश्वर चौक मंडळाचे सुरेश जैन यांनी म्हटले की,‘प्रत्येक वर्षी बैठक होत असते, पण कृती दिसत नाही. त्यामुळे याबाबत तरुणांनी योग्य तो अभ्यास करून पुढील निर्णय घ्यावा.’
बेलबाग चौक ते नाना पेठ मार्ग महत्त्वाचा म्हणून बंद केला जातो. त्यामुळे पूर्व भागातील मंडळांवर ताण येतो. हा मार्ग खुला ठेवावा, अशी मागणी यावेळी भाऊ करपे यांनी केली. बढाई समाजाचे प्रतिनिधी म्हणाले, ‘‘रस्ते बंद करणे हे अयोग्य आहे. पोलिस यंत्रणा सक्षम असताना सरकारनेही जबाबदारी घ्यावी. त्यासाठी देण्यात येत असलेली कारणे योग्य नाही.’’