महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – दि. १ सप्टेंबर- सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यापासून यंदा प्रथमच विसर्जन मिरवणूक न काढता पुण्यातील मंडळे जागेवरच गणेशमूर्तींचे विसर्जन करणार आहेत. त्यामुळे, दरवर्षी भव्य-दिव्य व गाजत-वाजत अनंत चतुर्दशीला निघणार्या मिरवणुकीला भाविक यंदा (दि. 1) मुकणार आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या उद्देशाने कार्यकर्तेही कमी संख्येने मंडळापाशी उपस्थित राहून गणपतीला निरोप देणार आहेत
गणेशोत्सवाचा प्रारंभ झाल्यानंतर काही वर्षे पुण्यात प्लेगची साथ होती. त्यानंतर, पहिले व दुसरे महायुद्ध, तसेच अन्य विविध घडामोडींच्या काळातही पुण्यातील मिरवणूक निघाली होती. दहा वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूची साथ असतानाही मिरवणूक निघाली होती. यंदा मात्र पुणे-मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने, अधिक काळजी घेण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. मिरवणूक काढणार नसल्याचे त्यांनीच जाहीर केल्यामुळे, रस्त्यावर गर्दी होणार नाही.
मिरवणुकीतील पहिले मानाचे पाच गणपती मंडळे, तसेच विविध प्रमुख मंडळांनी मंगळवारी करण्यात येणार्या विसर्जनाच्या वेळाही जाहीर केल्या आहेत. प्रमुख मंडळांनी विसर्जन सोहळ्याचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहरचना सोसायट्यांमध्ये, तसेच उपनगरामध्येही यंदाच्या गणेशोत्सवात फारसा उत्साह नव्हता. शाळाही बंद असल्याने, विद्यार्थ्यांची विविध पथकांसाठी चाललेली लगबग यंदा नव्हती. दरवर्षी या उत्सवात होणारी कोट्यवधी रुपयांची शहरातील उलाढालही यंदा ठप्प झाली होती. त्याचा शहराच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे.
