महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ ऑगस्ट ।। गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे चिखल, वाहतूक कोंडी, वीज खंडित होणे अशा त्रासांना सामोरे गेलेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मॉन्सूनची गती मंदावल्याने पुढील काही दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉन्सून अमृतसर, देहरादून, शहाजहानपूर, गोरखपूर, दरभंगा आणि कुचबिहार मार्गे अरुणाचल प्रदेशच्या दिशेने सरकत आहे. सौराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर परिसरातील चक्रीय वाऱ्याचा प्रभाव आता कमी झाला आहे. उत्तर प्रदेश ते बिहारदरम्यान असलेला कमी दाबाचा पट्टादेखील कमकुवत झाला आहे.
आठ ऑगस्टच्या सुमारास दक्षिण बांगलादेश परिसरात नवीन चक्रीय वाऱ्याचा प्रवाह तयार होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत देशभरात बहुतांश ठिकाणी हलका ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने सकाळपासूनच रस्त्यांवर वर्दळ दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, तुळशीबाग, टिळक रस्ता, अप्पा बळवंत चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
पुढील पाच दिवस वातावरण स्थिर
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक (डी) डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘अलीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. ते पश्चिमेकडे सरकत असताना मॉन्सूनच्या वाऱ्यांना वेग मिळाला आणि त्यामुळे कोकण व घाट परिसरात पावसाचा जोर वाढला होता. मात्र आता हे वारे कमकुवत झाले असून, त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील चार ते पाच दिवस हे वातावरण स्थिर राहील अशी शक्यता आहे.’’