महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ ऑगस्ट ।। बीडच्या परळी मधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेला गोट्या गीते सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. तब्बल ४३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही गोट्या गीते अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याच्या अटकेबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, तो बीडमधील वाल्मीक कराडचा उजवा हात म्हणून ओळखला जातो आणि तरीही त्याच्याविरोधात कठोर कारवाई झालेली नाही.
गोट्या गीतेच्या विरोधात बीड जिल्ह्यातच २५ गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, अपहरण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यासारखे गुन्हे आहेत. बीडमधील परळी जिथे महादेव मुंडेंची हत्या झाली तेथेच तो खुलेआम फिरत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. इतक्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवरही बीड पोलीस आणि परळी पोलीस गोट्याला का अटक करू शकले नाहीत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
फक्त बीडच नव्हे, तर पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथे ९ गुन्हे, लातूर जिल्ह्यात ३, परभणीमध्ये २, छत्रपती संभाजीनगरमध्ये १ आणि इतर जिल्ह्यांमध्ये ३ गुन्हे अशा एकूण ४३ गुन्ह्यांची नोंद गोट्याच्या विरोधात आहे. इतक्या जिल्ह्यांमध्ये गुन्ह्यांची मालिका असलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती का लागलेला नाही याबाबत सामाजिक आणि राजकीय स्तरावर संशय व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे, गोट्याच्या विरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई झाली असतानाही तो फरारच असून अनेकवेळा तो परळी आणि बीड परिसरात दिसून आल्याचे सांगण्यात येते. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे चित्र नाही. त्यामुळे गोट्याला स्थानिक राजकीय वा पोलिस आश्रय आहे का, याचीही चर्चा जोरात सुरू आहे.
महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले की, गोट्या गीते हा मुख्य आरोपी असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे आधीपासूनच दाखल आहेत. तरीही तो पोलिसांच्या हाती सापडलेला नाही, हे दुर्दैवी आहे. पोलिसांची गोट्याच्या अटकेकडे असलेली अनास्था म्हणजे कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
सध्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात पोलिस गोट्याचा शोध घेत आहेत. पण तो पुन्हा एकदा पोलिसांना गुंगारा देत असल्याचे दिसून येत आहे. जर वेळेत अटक झाली असती, तर आज महादेव मुंडे जिवंत असते, असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. आता संपूर्ण प्रकरणात गोट्याला आश्रय देणाऱ्यांवर कारवाई होणार का, आणि पोलिस यंत्रणा त्याला गजाआड टाकू शकेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.