Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढू….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ ऑगस्ट ।। गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्यावरून निर्माण झालेला प्रश्‍न सामोपचाराने सोडवू. मानाचे किंवा अन्य गणेश मंडळांमध्ये कोणताही मतभेद नाही. विसर्जन मिरवणुकीबाबत तोडगा काढण्यासाठी सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित केली जाणार आहे. याबाबत लवकरच समन्वयाने तोडगा काढू, असा निर्णय मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ५) जाहीर केला.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयात मंडळांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्‍वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीणसिंह परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नितीन पंडित, विकास पवार, केसरी गणेशोत्सव ट्रस्टचे अनिल सपकाळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, हुतात्मा बाबू गेन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्रमुख मंडळांचे पदाधिकारी श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, संजय बालगुडे, श्रीकांत भिसे, पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, विशाल गुंड, आनंद सगरे उपस्थित होते.

यंदा विसर्जन मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळाने मानाची मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर बेलबाग चौकमार्गे मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीतील सहभागी होण्यावरून भूमिका जाहीर केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ बेलबाग चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाच्या मिरवणुकीचा प्रारंभ दुपारी चारच्या सुमारास होईल. त्यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही, असे दोन्ही मंडळांच्या प्रमुखांनी नमूद केले.


गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका झाल्या. मिरवणुकीतील क्रमांकाबाबत पोलिस स्वतःहून कोणताही निर्णय घेणार नाहीत. जी परंपरा, प्रथा आहे; ती अबाधित राहावी. पोलिसांच्या दृष्टीने सर्व मंडळे सारखीच आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन विसर्जन मिरवणुकीबाबत निर्णय घ्यावा. त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा एकत्रित बैठकीचे आयोजन केले जाईल. – अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य देणे ही मंडळांची प्रमुख भूमिका आहे. गणेशोत्सव आणि मिरवणुकीबाबत मंडळांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मिरवणुकीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर मिरवणुकीबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. – श्रीकांत शेटे, अध्यक्ष, श्री कसबा गणपती मंडळ

पदाधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्दे

मानाच्या आणि अन्य मंडळांना पोलिसांकडून वेगळा न्याय दिला जातो

मिरवणुकीमध्ये ‘एक मंडळ, एक ढोल पथक’ नियम असावा

मानाच्या मंडळांसाठी पोलिसांनी इतर रस्त्यांवरील मंडळांची अडवणूक करू नये

विसर्जन मिरवणूक सकाळी सात वाजता सुरू करण्यास परवानगी द्यावी

लक्ष्मी रस्त्यावर आणखी मंडळांना परवानगी देऊ नये

गणेशोत्सवात बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता सुरू ठेवावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *