महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑगस्ट ।। पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असताना आता भक्ती-शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात ‘डीपीआर’ महामेट्रो प्रशासनाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील सुमारे ७५ टक्के भाग मेट्रो मार्गांशी जोडला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या सुमारे तीस लाखांहून अधिक असून हा आकडा झपाट्याने फुगत आहे. त्यामुळे नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याची मागणी विविध संघटना आणि संस्थांकडून सातत्याने केली जात आहे.
अखेर, नागरिकांचा मागणी लक्षात घेता निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे. हे अंतर सुमारे ३५ ते ४० किलोमीटर प्रस्तावित आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग, तसेच भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी ‘कनेक्ट’ होणार आहे.
यापुढील अपेक्षित प्रक्रिया
‘डीपीआर’ला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाणार
संबंधित आराखडा मान्यतेसाठी राज्य व नंतर केंद्र शासनाकडे पाठविला जाईल.
शासन मान्यतेनंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.
प्रकल्प मार्गी लागताच दररोजच्या वाहतूक कोंडीतून चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.
येथे असतील ‘जंक्शन’
1) नाशिक फाटा – या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. येथून भोसरी, चाकण, शहरातील दापोडी ते निगडी मार्ग तसेच, पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे.
2) निगडी – भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्टेशन येथे जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसेच, भोसरी व चाकणला ये-जा करता येणार आहे.
निगडी-चाकण मेट्रोची आवश्यकता
1) पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारण्याची गरज
2) भक्ती-शक्ती चौक ते चाकण हा मार्ग औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा
3) या मार्गावर मेट्रोचा विस्तार परिसराच्या सर्वांगीण विकासात उपयुक्त ठरेल.
4) दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होईल
निगडी भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सुपूर्त केला आहे. राज्य आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून मान्यता मिळाल्यावर काम सुरू होईल. या प्रक्रियेसाठी किमान एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो.
– डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो