महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। क्रिकेटमध्ये एकतर्फी सामना होणं ही काही नवी गोष्ट नाही. अनेक सामने एकतर्फी होतात आणि काही ओव्हरमध्ये संपतात. पण आयीसीसी पुरुष अंडर-19 वर्ल्डकप अमेरिका पात्रता फेरीत जबरदस्त सामन्याची नोंद झाली आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग कऱणाऱ्या संघाने फक्त 5 चेंडूत सामना जिंकला. हा सामना कॅनडा आणि अर्जेंटिना यांच्या अंडर-19 संघात झाला. अर्जेंटिना अंडर-19 संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 19.4 ओव्हर्समध्ये फक्त 23 धावा केल्या आणि सर्वबाद झाले. विशेष म्हणजे कॅनडाने पहिल्यात ओव्हरमध्ये हा सामना जिंकला.
अतिरिक्त धावांमधून जास्तीत जास्त धावा
जॉर्जियातील परमवीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. कोणताही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सात फलंदाज खाते न उघडता बाद झाले. संघाच्या 23 धावांपैकी ७ धावा अतिरिक्त होत्या, जे सर्वाधिक होते. कॅनडाचा वेगवान गोलंदाज जगमनदीप पॉलने तुफान गोलंदाजी केली. त्याने 5 षटकांत 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांनीही त्याला साथ दिली आणि अर्जेंटिनाचा डाव 20 षटकांतच गुंडाळला गेला.
कर्णधाराचे सलग चार चौकार
24 धावांचं माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कॅनेडियन संघाने वेळ वाया घालवला नाही. सलामीवीर धर्म पटेलने पहिल्या चेंडूवर धाव घेतली. त्यानंतर, कर्णधार युवराज समराने फ्रांझच्या पुढील चार चेंडूंवर सलग चौकार मारले. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. फ्रांझने त्या षटकात तीन वाइड बॉलही टाकले. अशाप्रकारे, कॅनडाने 49.1 षटकं म्हणजेच 295 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
विक्रमाची नोंद होणार नाही
या सामन्याला युवा एकदिवसीयचा दर्जा नव्हता. म्हणूनच हा विक्रम नोंदवला जाणार नाही. जर हा अधिकृत युवा एकदिवसीय सामना असता, तर त्याने सर्वात कमी षटकांत धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला असता. सध्या, हा विक्रम ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाच्या नावावर आहे. 2004 च्या अंडर-19 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया अंडर-19 ने स्कॉटलंडचे 22 धावांचे लक्ष्य 3.5 षटकांत पूर्ण केले होते.