महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट ।। पावसामुळे नैसर्गिकरीत्या वातावरणातील धूलिकणांवर होणारी फवारणी बंद झाल्यामुळे रावेत, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी, किवळे आणि परिसरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परिणामी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकाराने ग्रस्त रुग्णांची तब्येत बिघडत आहे.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रावेत, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण, किवळे परिसरात हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. वाढती रहदारी, खराब रस्ते तसेच अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे वातावरणामध्ये धूलिकणांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. दरम्यान, ‘‘धूळ आणि धुराचे कण, वातावरणातील दूषित घटकांमुळे हवा खूप प्रदूषित झाली आहे. परिणामी, दमा, फुफ्फुससंबंधित आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
बांधकाम प्रकल्प व रस्त्यांवरील धूळ यांचेही प्रमाण जास्त आहे. सध्या हवेतील सूक्ष्मकणामुळे पीएम इंडेक्सचे प्रमाण ३० टक्के वाढले आहे. लहान मुलांच्या अस्थमाचे प्रमाण वाढत आहे,’’ अशी माहिती आकुर्डी येथील क्षयरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र साळवे यांनी दिली.
काय आहेत तक्रारी ?
दमा, ॲलर्जी, सायनसग्रस्त रुग्णांना श्वास घेणे कठीण
डोळे चुरचुरणे, घसा कोरडा पडणे, सततचा खोकला आणि थकवा
लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आजारपणाची लक्षणे
या उपाययोजना शक्य
धूळ नियंत्रणासाठी पाण्याची फवारणी करणे
खराब रस्त्यांचे लवकर डांबरीकरण करणे
उघड्या मातीवर हरित पट्टे तयार करणे
वाहतुकीच्या नियमनाद्वारे धूलिकणांवर नियंत्रण
खड्डे तातडीने बुजविणे आवश्यक
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणावे