Workers Death: निगडीत चेंबरमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू, ऑप्टिकल फायबर टाकण्याचं सुरू होतं काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट ।। स्वातंत्र्यदिनाच्या सकाळी देशभरात तिरंगा फडकवून देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरण परिसरात तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. त्‍यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दुपारी निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली.

दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी मृत कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल आकुर्डी कार्यालयातील तीन कंत्राटी कामगार नेहमीप्रमाणे रोजच्या कामावर गेले होते. मात्र, चेंबरमध्ये उतरल्यावर हवाबंद जागेत गुदमरल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत.

घटनेनंतर परिसरात क्षणात खळबळ उडाली. स्थानिकांनी कामगारांना बाहेर काढण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, घराबाहेर कामाला गेलेली आपली माणसे आता परत येतील या आशेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांना, दुपारपर्यंत त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कळवण्यात आली. कुणाच्या कपाळावरचे कुंकू पुसले, कुणाच्या डोक्यावरची सावली हिरावली, तर कुणाच्या हातातील कष्टकऱ्याची ऊब कायमची हरपली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिन्ही घरांचे दिवे विझल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *