महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। आद्य स्वंयभू शक्तीपिठ असलेल्या सप्तशृंगी – वणी गडावर सलग तीन दिवस सुट्टी असलेल्या भाविकांची आदिमायेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असूून भाविकांना दर्शनासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागत आहे.
आठ दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले असून गडावरील निसर्गसौंदर्य खुलून गेले असून गडावर दाट धुक्यांची चादर पसरली आहे. अशा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटल्यासाठी तरुणाई सरसावली आहे. त्यातच धार्मिक दृष्ट्या पवित्र सुरु असलेला श्रावण मास शुक्रवार, ता. १५ रोजीचे स्वातंत्र्य दिन व श्री कृष्ण जन्माष्टमी, ता. १६ शनिवार रोजी आलेला गोपाळकाला व आज ता. १७ रविवारची असलेली सुट्टी अशा तीन दिवस सुट्टया आल्याने राज्यातील तसेच गुजरात, मध्यप्रदेशातील भाविक तीर्थाटन व पर्यटनासाठी बाहेर पडली असून सप्तशृंगी गडाला अग्रक्रम दिला आहे.
त्यातच सापुतारा येथे सुरु असलेला मान्सुन फेस्टीवल सुरु असल्याने सापुतारा येथे भेट देवून गुजरात व महाराष्ट्रातील हजारो पर्यटक गडावरही हजेेरी लावत असल्याने गडावरही श्रावण महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यात नांदुरी ते सप्तशृंगी गड दरम्यान घाट रस्त्याच्या सिमेंट कॉंक्राटीकरणाचे काम यामुळे या दरम्यानची वाहतूक ही संथगतीने होत असून गडावर वाहने पार्कींगची अपूरी सुविधा यात वाहनधारकांचा बरासचा वेळ वाया जात आहे.
गडावर दर्शनासाठी आलेले भाविक मंदिरात जाण्यासाठी पायरी मार्गापेक्षा रोप वेने मंदिरात जाण्यासाठी पसंती देत असल्याने रोप वे ने मंदीरात पोहचण्यासाठी दीड ते दोन तासांची प्रतिक्षा करावी लागत होती. दरम्यान गोकुळअष्टमी निमित्त शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता आदिमायेच्या मुर्तीजवळ राधाकृष्णांची मुर्तीची पुरोहितांनी मंत्रघोषात विधिवत अभिषेक महापुजा विधी करीत श्रीकृष्ण भगवानांचा जयघोष करीत जन्मोत्सव साजरा केला.