महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून मत चोरीचा मुद्द्यावरून गंभीर आरोप केले जात आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करत मतदान याद्यांमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असा गौप्यस्फोट केला होता. यादरम्यान आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यांची मते मिळणार नाहीत अशी १० हजार नावे काढून टाकण्याची आपल्याला ऑफर होती, असे कडू म्हणाले आहेत.
बच्चू कडू काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या आधी मिळालेल्या ऑफरबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, विधानसभेच्या आगोदर मला १० हजार लोकांची यादी मागितली होती, की ज्यांचे तुम्हाला मतदान भेटत नाही ती नावे आम्ही उडवून टाकतो. माझ्याजवळ व्यवस्थित पुरावे आल्यानंतर मी जाहीर करेन. त्यांनी असं म्हटलं होतं की आपले लोकं कसे निवडून आणायचे तर जे तुम्हाला न भेटणारं मतदान आहे ती यादी काढा, ते १० हजार कमी करून दुसरे घालू, अशी ऑफर होती. वेळ आली तर याचे पुरावा देऊ, असे बच्चू कडू टीव्ही९ शी बोलताना म्हणाले.
ऑफर कोणी दिली होती? सरकारमधील लोक होते की कोणी त्रयस्थ पार्टी होती? या प्रश्नावर सगळं हाती येऊद्या मी सगळं सांगतो. सरकारमधीलच लोक कमी करू शकतात ना, आपल्यात काय ताकत आहे? असे उत्तर बच्चू कडू यांनी दिले.
तसेच आपल्याला ऑफर स्वीकारणं बरं वाटलं नाही. कारण आम्हाला पूर्ण खात्री होती की आपलं जमतंयच (निवडून येतोय), असंही बच्चू कडू यांनी हसत स्पष्ट केलं.
