जगदीप धनखड यांच्यानंतर माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमारही ‘बेपत्ता’? या खासदारांचा खळबळजनक दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले गेले. अद्याप नवीन उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवारही जाहीर झालेले नाहीत, तसेच राजीनामा दिल्यापासून धनखड सार्वजनिक मंचावर दिसले नाहीत. तसेच आता माजी मुख्य निवडणूक आयुक्तही बेपत्ता झाले असल्याचे शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले आहेत. आज माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्त होते. ज्यांच्या मदतीने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक जिंकली, ते राजीव कुमार कुठे आहेत?

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेपत्ता झाले तसे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे, असे संजय राऊत म्हणाले. “राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केल्यानंतर त्याचे उत्तर राजीव कुमार यांनी द्यायला हवे होते. कारण त्यांच्याकडेच आयोगाची जबाबदारी होती”, असेही राऊत म्हणाले.

ज्यांनी शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्य-बाण हे चिन्ह घटनेविरोधाच जाऊन शिंदे गटाला दिले. त्यात किती कोटींचा व्यवहार झाला, हे सुद्धा मी सांगितले होते. ते राजीव कुमार याक्षणी कुठे आहेत? हा माझा प्रश्न आहे. सोशल मीडियावर हा प्रश्न मी उपस्थित केला असून त्यावर दिल्लीच्या वर्तुळातही चर्चा सुरू आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

राजीव कुमार दिल्लीच्याही बाहेर
“ज्याप्रमाणे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड दिसत नाहीत, तसे मत चोरी प्रकरणात राहुल गांधी आणि विरोधकांनी हल्ला सुरू केल्यानंतर तत्कालीन आयुक्तांना लोकांशी बोलण्यापासून किंवा त्यांचे मत व्यक्त करण्यापासून थांबविण्यात आले आहे. कदाचित त्यांना दिल्लीमध्येही आता ठेवलेले नाही”, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.

जगदीप धनखड कुठे आहेत?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अद्याप उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानीच आहेत. धनखड यांनी अद्याप कोणतेही विधान केलेले नसले आणि ते माध्यमांसमोर आले नसले तरी ते उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी राहत आहेत.

राजीनामा दिल्यानंतर, जगदीप धनखड लवकरच उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सोडून त्यांना मिळत असलेल्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित होतील अशी चर्चा होती. यासाठी त्यांनी स्थलांतरित होण्याची तयारीही सुरू केली आहे. पण, ते अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत आणि उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी राहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *