Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। जम्मू-काश्मिरमध्ये निसर्गाने कोप केला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक दुर्घटना घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ढगफुटी, भूस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सततच्या खराब हवामानामुळे आणि हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमुळे जम्मूच्या कटरा येथे वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. भाविकांना परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याठिकाणी नवीन प्रवाशांना यात्रेसाठी प्रवेश मिळू नये म्हणून ट्रॅव्हल स्लिप काउंटर देखील बंद करण्यात आले आहेत.

यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने कटरा बाजारात फिरण्यासही बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता यात्रेकरूंना उघड्यावर जाऊ देणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांना सावधान आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. यात्रेसाठी आधीच निघालेल्या भाविकांनाही लवकरात लवकर कटरा येथे परतण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी कोणत्याही अनुचित घटना टाळता याव्यात यासाठी लाऊडस्पीकरद्वारे सतत घोषणा दिल्या जात आहेत.

हवामान विभागाने पुढील काही तासांत जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सध्या जम्मू-काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफुटीची देखील घटना घडली आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाचे सांगितले आहे. जोपर्यंत पावसाची परिस्थिती आहे तोपर्यंत याठिकाणी यात्रेकरूंनी येऊ नये असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली होती यामध्ये ६० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर २०० जण बेपत्ता झाले होते. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळावर बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. ही ढगफुटीची घटना ताजी असतानाच जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे दोन ठिकाणी ढगफुटीत झाली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आणि ६ जण जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *