Anna Hazare on Pune Banner: पुण्यातील बॅनरबाजीवरून अण्णा हजारे नाराज : म्हणाले मी जे केलं ते आताच्या …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपांनंतर देशातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना लक्ष्य करणारे बॅनर पुण्यातील पाषाणमधील रस्त्यावर लावण्यात आलं होतं.

ज्यात ९० वर्षीय अण्णा हजारेंविरुद्ध मजकूर छापत त्यांना तुम्ही गप्प का? असा सवाल करून, त्यांना टोमणा मारण्यात आला होता. ज्याबद्दल अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत आपले मत स्पष्ट केलं आहे..

बॅनरबद्दल काय म्हणाले अण्णा हजारे?
पुण्यात लावलेल्या बॅनरबद्दल नाराजी व्यक्त करताना अण्णा प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले “मी १० कायदे आणले. मात्र ९० वर्षानंतर देखील मी करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं, ही अपेक्षा चुकीची आहे. अण्णांनी जे केलं ते आपण करावं, असं तरुण युवकांना वाटलं पाहिजे, देशाचे नागरिक आहेत तर, आपलं काही कर्तव्य आहे की नाही?”

अण्णा हजारे यांनी बॅनरबाजी करणाऱ्या लोकांचा समाचार घेताना म्हंटले, “भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आणि भ्रष्टाचारा आणले. माहितीचा अधिकार कायदा देशाला मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात जागृती आली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकआयुक्त असे १० वेगवेगळे कायदे आणले. मग ९० वर्षांचं झाल्यानंतरही मी काम करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर हे चुकीचं आहे”.

मी जे केलं ते आताच्या तरुणांनी करावं- अण्णा हजारे
“’काल स्वतंत्र दिवस साजरा केला. नुसता तिरंगा हातात घेऊन होणार नाही, बोट दाखवून काहीही होणार नाही. मी मोठ्या आशेने तरुणाकडे पाहतोय, युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती आहे, ही जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही’, असे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. “मागच्या काळात मी जे केलं ते आताच्या तरुणांनी आता करावं. युवकांनाही वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य आहे की नाही. मी देशाचा नागरिक आहे, या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची देखील आठवण ठेवली पाहिजे. मात्र, नुसतं बोट दाखवायचं आणि हे करा ते करा. मात्र, यामधून काहीही होणार नाही. तरुणांनी जागं झालं पाहिजे. मी तरुणांकडे मोठ्या अपेक्षाने पाहत आहे. मी हे कायदे आणले आणि तरुणांच्या हाती दिले. मग आज एवढ्या वर्षांनंतरही असा आवाज कानांवर येतो की अण्णा हजारेंनी जाग व्हावं, ही अपेक्षा चुकीची आहे”, असं अण्णा हजारे म्हणाले.

अण्णा हजारेंनी २०१२ मध्ये दिल्लीत (Delhi) मोठं आंदोलन उभारलं होतं. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर झालेल्या या आंदोलनात देशभरातून लोक सहभागी झाले होते आणि याच आंदोलनाचा फटका २०१४ मध्ये काँग्रेसला बसला. काँग्रेसची सत्ता जाण्यामध्ये कुठेतरी या आंदोलनाचा देखील वाटा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *