महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। मुंबईसह ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे आज शाळांना सुट्टी देण्यात आली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी उद्याचा दिवस देखील महत्वाचा राहणार आहे. कारण हवामान खात्याने या ठिकाणी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेला अलर्ट लक्षात घेता अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुठे-कुठे शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार आहेत हे घ्या जाणून.
पनवेल, रायगड –
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रम शाळा, व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्र यांना उद्या २० ऑगस्ट रोजी सु्ट्टी देण्यात आली आहे.
सातारा –
सातारा जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २० आणि २१ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. पावसाची स्थिती पाहता प्रशासनाने सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड, सातारा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात पर्जन्य परिस्थिती बघून निर्णय घेण्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
लोणावळा –
लोणावळा परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. पुढचे २ दिवस होणाऱ्या मुसळधार पावसावर लोणावळा नगर परिषद आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर –
पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.
पावसाचा अलर्ट कुठे-कुठे?
दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा याठिकाणी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.