महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट ।। पुण्यात मेट्रोच्या दोन नव्या स्थानकांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. स्वारगेट ते कात्रज मार्गावर आणखी दोन नवीन स्थानके होणार आहेत. बिबवेवाडी आणि बालाजीनगर ही दोन नवी स्थानके या मार्गवर होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यापूर्वी स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. दोन नवी स्थानके होणार असल्याने मेट्रोतून प्रवास करताना नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे.
पुणे मेट्रोच्या टप्पा-1 अंतर्गत बालाजीनगर–बिबवेवाडी व स्वारगेट–कात्रज या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेट्रो सुरू झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडीमधून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, याचा पुणेकरांना नेहमीच त्रास होतो. या पाच किलोमीटरच्या मेट्रो मार्गावर आता आणखी दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात येत आहे. त्यानुसार पुणे मेट्रोच्या टप्पा – 1 अंतर्गत स्वारगेट – कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर येथे दोन नवीन स्थानके करण्यात येणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
स्वारगेट आणि कात्रज या ५ किमीच्या मेट्रो मार्गावर याआधीच ३ स्थानकांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या स्थानकांचा समावेश होता. यामध्ये आता आणखी दोन स्थानकांचा समावेश झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बालाजीनगर आणि बिबवेवाडीमध्ये मेट्रो स्थानक व्हावे, अशी मागणी होती. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्याला फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे.
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर येथे नवीन स्थानके उभारल्यास अनेक फायदे होतील. या भागातील रहिवाशांना मेट्रोची सुविधा जवळ मिळेल. त्यामुळे पुणेकरांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होईल. वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल. स्थानकांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. पर्यावरणपूरक वाहतूक वाढल्याने प्रदूषण कमी होईल. मेट्रोमुळे धनकवडी, बिबवेवाडी आणि बालाजीनगर परिसरातील नागरिकांना स्वारगेट आणि कात्रज येथील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि प्रवास सुलभ होईल.