महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।। पुण्यातील लांबलचक गणपती विसर्जन (Ganesh Visarjan 2025) मिरवणुकीवरून पेटलेला वाद आज अखेर मिटला आहे. आम्हाला 36 तासहून अधिक वेळ रांगेत थांबावं लागतं, असं म्हणत पुण्यातील अनेक मंडळांनी मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीच्या आधी आपली मिरवणूक काढून गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला होता. मानाच्या गणपतीआधी विसर्जन करणं योग्य नसल्याने आता पुण्यातील मंडळांच्या वर्तुळात नाराजीचं वातावरण होतं. अशातच काल (21 ऑगस्ट ) पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची बैठक घेतली. तर आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) बैठक घेतली. या बैठकीमध्ये अखेर गणेशोत्सवाचा वाद मिटला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीनंतर या वादावर तोडगा निघाला आहे. परंपरेनुसार विसर्जन मिरवणुक होणार आहे. सकाळी 9.30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या बैठकीला मानाचे गणपती मंडळाचे प्रतिनिधी आणि इतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. अखेर त्यांच्यातील वाद आज बैठकी अंती शमला आहे. या बैठकीत खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार हेमंत रासने यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे या वादावर अखेर आज तोडगा निघाला असून विघ्नहर्त्याचे स्वागत आता मोठ्या उत्साहात एकदिलाने केलं जाईल.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पाच मनांच्या गणपती मंडळांचा आणि शहरातील इतर मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत वाद आहे. “मानाचे विरुद्ध कामाचे” असा वाद गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. त्या अनुषंगाने मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत हि बैठक सुरू आहे. मानाच्या पाच आणि तीन गणेश मंडळ विरुद्ध इतर गणेश मंडळ असा हा वाद सध्या सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत पोलिसांनी अनेक बैठक घेतल्या. मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा वाद सोडवण्यासाठी खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार रासने यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आज खासदार मुरलीधर मोहोळ हे घेत असलेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहे.