महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट ।। लोकसभेनंतर राज्यसभेमध्येही ऑनलाइन गेमिंग बिल मंजूर झाले. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे. खास करुन रिअल मी गेम व्यवसायांशी संबंधित कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. विधेयकामुळे गेमिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी ड्रीम ११ ने गेमिंग सेक्टरमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
ऑनलाइन गेमिंग विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ड्रीम ११ कंपनीने घाईघाईत आपले रिअल मनी गेमिंग युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या नव्या गेमिंग बिलात पेड ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ड्रीम ११ कंपनीने रिअल मनी गेमिंग व्यवसाय बंद करण्याचे ठरवले आहे. यामुळे ड्रीम-११ प्लॅटफॉर्मवरील नोंदणीकृत २८ कोटींहून अधिक वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
फँटसी गेमिंग कंपनी ड्रीम ११ ची सुरुवात २००८ मध्ये झाली. हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी या कंपनीची स्थापना केली. वाढती लोकप्रियता आणि २८ कोटींहून अधिक वापरकर्त्यांच्या संख्येमुळे ड्रीम ११ भारतातील नंबर एकचे फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म बनले. आर्थिक वर्ष २४ मध्ये कंपनीने तब्बल ९,६०० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. यातील ९० टक्के महसूल रिअल-मनी स्पर्धांमधून आल्याचे म्हटले जात आहे. यात क्रिकेट संबंधित खेळांचे मोठे योगदान होते.
यूजर्सच्या पैशांचं काय?
ड्रीम ११ ॲपमध्ये जमा झालेले पैशांचे भविष्य ऑनलाइन गेमिंग विधेयकाच्या बदलत्या नियमांशी आणि संभाव्य धोरणात्मक बदलांशी जोडलेले आहे. या प्लॅटफॉर्मवर आरबीआय देखील थेट कारवाई करत नाही. सध्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे, ते लागू झालेले नाही. हे विधेयक लागू होण्यापूर्वी तुमचे पैसे काढा. सध्या यातील प्ले टू प्ले ऑप्शन बंद झाले आहे. विधेयक लागू झाल्यानंतर ड्रीम ११ ॲप बंद होऊ शकते. त्यामुळे आताच तुमचे पैसे ताबडतोब काढावेत. अन्यथा तुमचे पैसेही बुडू शकतात.
ड्रीम ११ च्या रिअल मनी गेम्स युनिटच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, नवा कायदा लागू झाल्यानंतर ड्रीम ११ चे पेमेंट-आधारित गेम सुरु ठेवणे शक्य नसल्याचे सीईओ हर्ष जैन यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. कंपनीने त्याच्याशी संबंधित सर्व कायमस्वरुपी आणि करारावर आधारित नोकऱ्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
लाँचनंतर ड्रीम ११ चा व्यवसाय झपाट्याने वाढला. २०२१ पर्यंत त्याचे मूल्यांकन ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. ड्रीम ११ कंपनीला टायगर ग्लोबल, क्रिसकॅपिटल, मल्टीपल्स आणि टीसीव्ही यांचे समर्थन आहे. कंपनीने अद्याप रिअल गेम्स युनिट बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या ड्रीम ११ ॲप सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.