महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ सप्टेंबर -सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यात सापडलेल्या दूरसंचार कंपन्या आपला महसूल वाढविण्यासाठी ग्राहकांच्या बोकांडी बसणार आहेत. त्यामुळे मोबाईलचे कॉलरेट 10 टक्क्यांपासून 27 टक्क्यांपर्यंत महागणार आहेत. परिणामी, मोबाईलवर दिवसरात्र गप्पा मारणाऱयांना आपल्या तोंडाला आवर घालावा लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एअरटेल, व्होडाफोन या दूरसंचार कंपन्यांना मोठा झटका दिला. दोन्ही कंपन्यांनी दूरसंचार विभागाची एजीआरची (ऍडजेस्टेड ग्रॉस रिव्हेन्यू) हजारो कोटींची रक्कम थकवली आहे. यापैकी 10 टक्के रक्कम पुढील सात महिन्यांच्या आत दूरसंचार विभागाकडे जमा करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना दिला आहे. त्यानुसार एअरटेलला 2600 कोटींची तर व्होडाफोन-आयडियाला 5000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडे भरावी लागणार आहे. त्यामुळे कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ही रक्कम उभी करण्यासाठी कंपन्यांनी ग्राहकांच्या खिशावर डोळा ठेवला आहे.
ब्रोकरेज फर्म जॅफरीजच्या अंदाजानुसार एअरटेल आपल्या कॉलरेटमध्ये कमीत कमी 10 टक्क्यांची तर व्होडाफोन 27 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. ग्राहकांना येत्या तीन महिन्यांतच या दरवाढीची झळ बसणार आहे.
दूरसंचार कंपन्यांनी चार वर्षांत पहिल्यांदाच गेल्या डिसेंबरमध्ये 40 टक्क्यांची दरवाढ केली होती. त्यातून यंदाच्या पहिल्या सहामाहीत संबंधित कंपन्यांची कमाई 20 टक्क्यांनी वाढली. या कंपन्यांना डेटा युसाजची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षांत प्रति युजर सरासरी 200 रुपये महसुलाची गरज लागेल, असे जाणकारांचे मत आहे.
