महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।। घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई, पुण्यात भक्तिमय वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील दगडुशेठ गणपती बाप्पाासमोर आज सकाळी अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
आज ऋषीपंचमी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा समोर ३५ हजार महिलांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केलं. सकाळी पुण्यात काहीसा पाऊस होता. मात्र,पाऊस असला तरीही महिलांनी या भव्य कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. पहाटे ३ वाजल्यापासूनच महिलांनी याठिकाणी एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या. वर्षातून एकदा अथर्वशीर्ष पठण केल्यानंतर वर्षभराची एनर्जी मिळते, असं मत काही महिलांनी व्यक्त केलं.
ओम गं गणपतये नम च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. गणपती बाप्पााच्या आराधनेने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण झाले होते. वर्षातून एकदा हे सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले जाते.