आझाद मैदानावर या, एक दिवस उपोषण करा ! मनोज जरांगे यांना परवानगी देताना अटी-शर्तींचा पाऊस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करताच फडणवीस सरकार खडबडून जागे झाले. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर एक दिवसाच्या उपोषणासाठी परवानगी दिली आहे. ही परवानगी देतानाही अटी-शर्तीचा पाऊस पाडण्यात आला आहे. जरांगे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही कायद्याचे पालन करू, पण उपोषण मात्र बेमुदतच होणार! असा ठाम निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. दरम्यान, सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जलसंपदामंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत.

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीहून सकाळी १० वाजता मुंबईकडे कूच केले. मुंबईला प्रस्थान करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी गणेशाचे पूजन केले. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्यांचा काफिला मार्गस्थ झाला. यावेळी आंतरवाली सराटीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जरांगे यांचा काफिला मुंबईकडे निघताच फडणवीस सरकारला जाग आली. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना एक दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली. मात्र ही परवानगी देतानाही जाचक अटी-शर्ती लादण्यात आल्या.

अशा आहेत सरकारच्या अटी-शर्ती…

आंदोलनास फक्त एक दिवसासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत परवानगी. शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्यांच्या दिवशी आंदोलनाला परवानगी नाही.

ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरापर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त पाच वाहनांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी ठरवलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.

आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोक सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानातील सात हजार चौरस मीटर जागा एवढ्याच लोकांना सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिलेली असल्याने त्यांचा हक्कही अबाधित राहील.

आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही
परवानगीशिवाय माईक, स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधने वापरता येणार नाहीत.
आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही.
आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकण्यास पूर्ण बंदी आहे.
आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही.
आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण…
मुंबई उच्च न्यायालयाने एक दिवस अगोदरच मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारली होती. परंतु आज सरकारने एक दिवसाची परवानगी अटी-शर्तीवर देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या तसेच न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. कायद्याने घातलेल्या अटी-शर्तीचे मी आणि मराठा समाज कसोशीने पालन करू. पण सरकारनेही एकाच दिवसात आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली. सरकार मागण्या मान्य करणार असेल तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तीन लाख ट्रक गुलाल उधळण्याचा दिलेला शब्द मी पाळेल, पण सरकार चालबाजी करणार असेल तर मी बेमुदत उपोषणावर ठाम आहे, माझा निर्णय बदलणार नाही, असेही मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *