महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 1 सप्टेंबर ।। मुंबईत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावरुन हायकोर्टाने खडसावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं आहे. कोर्टाने मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत, रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणाहून आंदोलकांना उद्यापर्यंत हटवा. उद्या संध्याकाळी ४ पर्यंत ही कारवाई करा असा आदेश दिला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.
“मी प्रवासात असल्याने कोर्टाने नेमकं काय म्हटलं हे ऐकलेलं नाही. जे समजलं आहे त्यानुसार कोर्टाने परवानगी देताना दिलेल्या अटी-शर्थी, तसंच रस्त्यावर जे सुरु आहे त्यासंदर्भात नाराजी जाहीर केली असून, काही निर्देश दिले आहेत. कोर्टाच्या निर्देशाचं पालन करणं प्रशासनाला क्रमप्राप्त असून त्याचं पालन केलं जाईल,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
“बैठकीत आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार केला. तसंच जिथे मार्ग काढता येऊ शकतात ते कायदेशीररित्या कोर्टात कसे टिकवू शकतो यासंदर्भातही चर्चा झाली. त्यातील अधिकची माहिती मागितली आहे. कायदेशीर मार्ग शक्य असल्यास काढण्याची आमची मानसिकता आहे,” असंही ते म्हणाले.
“पत्रकारांवर हल्ला आणि महिला पत्रकारांचा विनयभंग हे गालबोट लावणारं आहे. आपण 30 पेक्षा जास्त मराठे मोर्चे, त्यांची शिस्त पाहिली आहे. त्या मोर्चांनंतर सरकारने सकारात्मकपणे त्या काळात घेतलेला निर्णयही पाहिला आहे. पत्रकार आपले काम करत असतात. लोकशाहीत तुमची भावना पोहोचवत असताना असा हल्ला होणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. याचा सर्व स्तरावर निषेध झालाच पाहिजे,” असं मत त्यांनी मांडलं आहे.