महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। सागरी मंडळाने बराच काळ वाट पाहिल्यानंतर अखेर Mumbai-Konkan Ro Ro फेरी सेवा सुरू केली आहे. सुरुवातीला ही सेवा गणेश चतुर्थीच्या दोन-तीन दिवस आधी सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणांमुळे तो मुहूर्त चुकला. आता १ सप्टेंबरपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे.
या रो रो फेरी सेवेमुळे मुंबई ते रत्नागिरी प्रवास फक्त तीन तासांत आणि मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासांत पूर्ण करता येणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात, विशेषतः गणेशोत्सव आणि होळीच्या वेळी मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या प्रचंड ट्रॅफिकपासून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याने १०-१२ तास लागणाऱ्या प्रवासाऐवजी हा पर्याय अल्पावधीत पूर्ण होऊन प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचवणार आहे.
या फेरी सेवेसाठी भाडेप्रणाली देखील ठरवण्यात आली आहे. प्रवाशांसाठी तिकीट २,५०० रुपये (इकॉनॉमी क्लास) पासून ९,००० रुपये (प्रथम श्रेणी) पर्यंत असेल. वाहनांसाठीही स्वतंत्र भाडे ठेवण्यात आले आहे. कारसाठी ६,००० रुपये, दुचाकीसाठी १,००० रुपये आणि सायकलसाठी ६०० रुपये भाडे आकारले जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना आपली वाहने सोबत नेण्याची सोय मिळणार आहे, ज्यामुळे पुढील प्रवास सोपा आणि सोयीस्कर ठरणार आहे. रो रो फेरीमध्ये एकाच वेळी ५० चारचाकी, ३० दुचाकी आणि मिनी-बस वाहून नेण्याची क्षमता आहे. ही सेवा मुंबईच्या भाऊचा धक्का ते जयगड आणि विजयदुर्गच्या जेटींना जोडेल.