![]()
महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०५ सप्टेंबर | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या २६ लाख ३० हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार ५३१ महिला आहेत. शासन स्तरावरून प्राप्त याद्यांमध्ये लाभार्थी महिलांचे शहर- तालुक्यांचीच नावे आहेत. त्यामुळे शहरी भागातील लाडक्या बहिणींचा शोध अंगणवाडी सेविकांना लागलेला नाही. त्यांची घरेच सापडत नसल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीनुसार वयाचा निकष डावलून अर्ज केलेले व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थींची यादी घेतली आहे. त्यातील सगळेच अपात्र आहेत की काहीजण पात्र आहेत, याची खात्री पडताळणीतून केली जात आहे. त्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे, मात्र त्यांना शहरी भागातील लाभार्थी खूप शोधूनही सापडत नाहीत. अनेकजण अर्जातील पत्त्यावर रहायला नाहीत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा वेळ व पैसा खर्च होऊ लागला आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतरही पडताळणी पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे पुढील टप्प्यात आता दोन लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचा शोध घेऊन त्यांचाही लाभ बंद केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
जूनपासून लाभ बंद झाल्याच्या तक्रारी वाढल्या
जूनपासून आम्हाला लाभ मिळत नाही म्हणून शेकडो महिलांनी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सध्या योजनेच्या निकषानुसार वय कमी- अधिक असलेले आणि कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे. पण, अनेकांचे पत्ते सापडत नसल्याने पडताळणीस अडचणी येत आहेत. पडताळणी पूर्ण होऊन शासनाकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर या महिलांच्या लाभाचा निर्णय होईल.
– रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
तीन महिन्यांपासून नाही लाभ, आता…
लाडकी बहीण योजनेसाठी वयाची अट (२१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय) निश्चित करूनही अनेकांनी तारीख बदलून अर्ज केले आणि योजनेचा लाभ घेतला. दुसरीकडे एका कुटुंबातील एक अविवाहित मुलगी व विवाहिता अशा दोघांनाच लाभ मिळेल, असा निकष होता. तरीपण, एका कुटुंबातील तीन, चार महिला लाभार्थी झाल्या. त्यानंतर शासनाने अन्य शासकीय वैयक्तिक योजनांचे लाभार्थी, पुरुष व शासकीय कर्मचारी लाभार्थी, चारचाकी वाहने असलेल्या बहिणींचा लाभ बंद केला. आता एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला व वयाचा निकष डावलून अर्ज केलेल्यांचाही लाभ जूनपासून बंद आहे. पडताळणी होऊन त्यावर शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत, त्यांना लाभ मिळणारच नाही.
लाभार्थी पडताळणीची स्थिती
कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी
८६,८०८
वयाच्या अटीत अपात्र
१७,७२३
पडताळणी होणारे एकूण लाभार्थी
१,०४,५३१
आतापर्यंत पडताळणी
४२ टक्के
