Maharashtra Weather : बाप्पाला निरोप देताना राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. 06 सप्टेंबर | अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत सकाळपासूनच लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते हळूहळू वायव्य दिशेकडे सरकत आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने समुद्र सपाटीपासून तब्बल ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही हवामान प्रणाली पुढील काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप जाणवत असतानाच शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. अनेक भागांमध्ये रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले. सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात हलक्या सरी सुरू आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज पालघर, नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवर भूस्खलनाचा धोका संभवतो, तसेच नद्यांच्या पात्रात पाणीपातळी झपाट्याने वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, ठाणे, रायगड, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा यलो इशारा देण्यात आला आहे. या भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. राज्यातील हवामान परिस्थिती पाहता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कमी दाब क्षेत्र तीव्र झाल्यास कोकण किनारपट्टीवर पुन्हा मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *