महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०६ सप्टेंबर | आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यातही गणपती विसर्जनचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुणे शहरात सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक आणि गुलालाच्या उधळणीमुळे संपूर्ण पुणे शहराला आज वेगळंच स्वरुप आलं आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी पुण्यातील ठिकठिकाणचे रस्ते दुमदुमले आहेत. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडली. अजित पवार यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत बाप्पाची महापूजा केली. यानंतर आता दगडूशेठ गणपती हा विसर्जनसाठी सज्ज झाला आहे. यंदा या गणपतीची मिरवणूक खास गणनायक रथातून निघणार आहे. तर दुसरीकडे पुण्याचा पहिला मानाचा गणपती असलेल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. काही वेळापूर्वी याच गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर चांदीच्या पालखीत बाप्पाला विराजमान करण्यात आले. आता हा गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ होईल. प्रभात बँड हे यंदाच्या या मिरवणुकीचे खास आकर्षण असणार आहे.
पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांतील वाहतुकीत बदल केले आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्या, त्याला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी अनेक रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात आले आहेत. हे सर्व रस्ते ७ सप्टेंबरपर्यंत बंद असणार आहे. तसेच पुण्यात विसर्जन पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पुण्यात वाहतुकीची व्यवस्था कशी?
सकाळी ७ वाजल्यापासून बंद असलेले रस्ते
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता: काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक.
लक्ष्मी रस्ता: संत कबीर चौकी ते टिळक चौक (अलका टॉकीज).
बगाडे रस्ता: सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक.
गुरुनानक रस्ता: देवजीबाबा चौक ते गोविंद हलवाई चौक.
सकाळी १० वाजल्यापासून बंद असलेले रस्ते
गणेश रस्ता: दारूवाला पूल ते जिजामाता चौक.
केळकर रस्ता: बुधवार चौक ते टिळक चौक.
दुपारी १२ वाजल्यापासून बंद असलेले रस्ते
बाजीराव रस्ता: सावरकर रस्ता ते फुटका बुरूज चौक.
कुमठेकर रस्ता: टिळक चौक ते विश्रामबाग चौक.
शास्त्री रस्ता: सेनादत्त चौकी ते टिळक चौक.
दुपारी ४ वाजल्यापासून बंद असलेले रस्ते
जंगली महाराज रस्ता: झाशीची राणी चौक ते खंडूजी बाबा चौक.
कर्वे रस्ता: नळ स्टॉप ते खंडूजी बाबा चौक.
फर्ग्युसन रस्ता: खंडूजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय.
भांडारकर रस्ता: पीवायसी जिमखाना ते डेक्कन जिमखाना चौक.
सोलापूर रस्ता: ढोले पाटील रस्ता ते जेधे चौक.
पार्किंगची व्यवस्था
पेशवे उद्यान, सारसबाग
पाटील प्लाझा पार्किंग
नीलायम चित्रपटगृह
स.प. महाविद्यालय मैदान
फर्ग्युसन महाविद्यालय मैदान
नदीपात्र (भिडे पूल ते गाडगीळ पूल)
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
दरम्यान पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अनेक ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. यंदा शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने मानाच्या गणपती मंडळांना वेळापत्रकही देण्यात आले आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यंदा ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आली असून यंदा शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.