Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा ! पंजाबात २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०७ सप्टेंबर | पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीतील मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे, तर १.७५ लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. २३ जिल्ह्यांमधील १,९९६ गावे पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीपंजाबमधील पुराचा फटका बसलेल्या भागांना भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पंजाबचा पूरग्रस्त जिल्हा गुरुदासपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच पूरग्रस्त लोक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. पूर परिस्थितीची माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितलं की, पुरामुळे मृतांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे, तर १.७५ लाख हेक्टर शेती जमिनीवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये वाहणाऱ्या रावी, सतलज, व्यास नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू
गेल्या काही दिवसांत पंजाबमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनली आहे. एनडीआरएफ, लष्कर, सीमा सुरक्षा दल, पंजाब पोलीस आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. शनिवारी पोंग धरणाची पाण्याची पातळी किंचित कमी होऊन १,३९४.१९ फूट झाली, मात्र ती चार फूट जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.

२००० गावं पाण्याखाली
राज्याचे अर्थमंत्री हरप्रीत सिंग चीमा यांनी या पुराला पाच दशकांतील सर्वात वाईट पूर म्हटलं आणि सांगितलं की, पंजाब आणि शेजारच्या डोंगराळ राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे सर्व जिल्ह्यांतील सुमारे २००० गावांना मोठा फटका बसला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ३.८७ लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत, ज्यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जोरदार प्रवाहात एक व्यक्ती गेली वाहून
फिरोजपूर जिल्ह्यातील तली गुलाम गावात एका ५० वर्षीय व्यक्तीचा जोरदार प्रवाहात वाहून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर वाढली आहे, ज्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हे आकडे १ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीतील आहेत. आतापर्यंत २२,८५४ लोकांना बाधित भागातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *