राज ठाकरेंचा राज्य सरकारला संतप्त सवाल, मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का ?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – दि. ४ सप्टेंबर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. सध्या राज्यात २ सप्टेंबरपासून मिशन बिगीन अगेनला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही मंदिरं उघडण्यात आली नाही आहेत, यावरुनच राज ठाकरे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मंदिरं उघडण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात मंदिरं उघडण्याबाबत राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?.

कोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या. आणि लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपाळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे, सरकारच्या आदेशांचं अत्यंत समजूतदारपणाने पालन केलं आहे त्यामुळे उद्या मंदिर उघडली तर ह्या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल ह्याची मला खात्री आहे.

अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असे खडेबोलही सरकारला सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *