महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ०९ सप्टेंबर | सध्या सर्व गोष्टी ऑनलाइन होतात. फक्त काही मिनिटांत तुम्ही कोणतीही गोष्ट करु शकतात. मग ते जगाच्या कानाकोपऱ्यात कोणाला मेसेज करणं असो किंवा पैसे पाठवणे, अवघ्या काही सेकंदातच सर्व कामे होते. ऑनलाइन पेमेंटसाठी यूपीआय हे प्रभावी माध्यम आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही यूपीआय पेमेंटचा वापर करते. यूपीआयबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता यूपीआयमध्ये अजून एक प्रोव्हायडरची एन्ट्री होणार आहे.
हैदराबादस्थित स्टार्टअप व्हियोना फिनटेकला NPCI ने मान्यता दिली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या व्हियोना फिनटेकला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे वेगाने वाढणाऱ्या यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस इकोसिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्राम पे (GRAAMPAY) आणि व्हिओना पे (VIYONA PAY) असे दोन अॅप या कंपनीने बनवले आहे. त्यांनी आपल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलंय की, या मंजुरीमुळे बँकांसोबत भागीदारी करुन भारतातील टियर २, टियर ३ आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटचा विस्तार करण्यासाठी मदत होईल.
याबाबत व्हिओना फिटनेटकचे संस्थापक रवींद्रनाथ यारलागुड्डा यांनी सांगितले की, ही मंजुरी शेतकरी, दुकानदार आणि कुटुंबासाठी यूपीआय पेमेंट अधिक सुलभ करण्यासाठी एनपीसीआयने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. कंपनी शहरी आणि वंचित समुदायासाठी सोपी आर्थिक साधने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.
रवींद्रनाथ यारलागुड्डा यांनी सांगितले की, GRAAMPAY हे अॅप शेतकरी, लहान व्यापारी आणि स्थानिक समुदायांना डिजिटल कनेक्शन आणि पेमेंट व्यव्हार करण्यासाठी सक्षण करते. तसेच ई कॉमर्सलादेखील समर्थन करते. गावागावातील उद्योजकांना (VLEs) नेटवर्कमुळे आर्थिक बाबतीत साक्षर बनवते.