महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ सप्टेंबर | Gold Prices Hit All-Time Highs: 10 सप्टेंबरपर्यंत चालू वर्षाचे 253 दिवस आणि 6,072 तास संपले, आणि या काळात सोन्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. दिल्ली बाजारात सोन्याच्या भावात तब्बल 34,050 रुपयांची वाढ झाली असून, या वर्षी आतापर्यंत सोनं 43% पेक्षा जास्त महागलं आहे. मंगळवारी एकाच दिवसात सोन्याचा भाव 5,000 रुपयांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.
बुधवारीही सोन्याच्या भावात 250 रुपयांची वाढ झाली आणि भाव 1,13,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नव्या शिखरावर पोहचला. अखिल भारतीय सराफा संघटनेच्या माहितीनुसार, मंगळवारी हा भाव ₹1,12,750 प्रति 10 ग्रॅम होता. 99.5 टक्के शुद्धतेचं सोनंही विक्रमी पातळीवर पोहचलं. डॉलरची घसरण, अमेरिकेत व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि जागतिक पातळीवरील मध्यवर्ती बँकांची विक्रमी खरेदी हे या तेजीमागचे मुख्य घटक आहेत.
याउलट चांदीचे भाव घसरले असून, बुधवारी भाव ₹300 नी खाली येत ₹1,28,500 प्रति किलोवर स्थिरावला. मागील सत्रात चांदी ₹1,28,800 प्रति किलोवर होती. जागतिक बाजारात मात्र स्पॉट गोल्ड डॉलर 3,657 प्रति औंसवर तर चांदी डॉलर 41 प्रति औंसवर होती.
तज्ञांच्या मते, अमेरिकन बाँड यिल्डमधील घसरण, मध्य पूर्वेतील तणाव आणि जगभरातील केंद्रीय बँकांची सततची खरेदी यामुळे सोनं सुरक्षित गुंतवणुकीचं प्रमुख साधन ठरत आहे. वेंचुराचे कमोडिटी प्रमुख एन. एस. रामास्वामी यांनी सांगितलं की, सोनं आता प्रत्येक गुंतवणूक पोर्टफोलिओचा आवश्यक भाग बनत आहे. फ्रान्स-जपानमधील राजकीय अस्थिरता आणि रशियावरील अमेरिकी निर्बंध यामुळेही दर नव्या उच्चांकावर पोहचले.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव दिल्ली बाजारात ₹1.25 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या धातूकडे आता केवळ दागिन्यांसाठी नव्हे तर सुरक्षित संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने बघायला हवे.