महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजयसिंग – नवीदिल्ली – दि. ४ सप्टेंबर – सीमेवर चीन-भारत दरम्यान तणाव कायम आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी सैन्य सज्जतेचा आढावा घेतला. आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वांत चांगले आहेत. आमच्या जवानांचे मनोबल उंचावलेले असून ते सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहेत, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले आहे.
लेहला पोहोचल्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली. सैन्य सज्जतेचा आढावा घेतला. गेल्या २-३ महिन्यांपासून तणावस्थिती आहे. चीनसोबत लष्कर आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. द्विपक्षीय चर्चेद्वारे तोडगा निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.
पूर्व लडाख परिसरातील पेगोंग त्सो परिसरात चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा प्रयत्न गेल्या सोमवारी भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. पूर्व लडाखमध्ये पेगोंग त्सो परिसराजवळ उभय देशाचे सैनिक २९ ऑगस्टच्या रात्रीपासून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चिनी सैनिकांनी त्यांची सीमा ओलांडत भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.
या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखमधील सैन्य सज्जतेचा आढावा घेतला.