महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १३ सप्टेंबर | पितृपंधरवडा संपल्यानंतर लगेचच नवरात्रोत्सव सुरू होत आहे. 22 सप्टेंबर पासून घटस्थापनेला सुरूवात होत आहे. या 9 दिवसांच्या काळात राज्यातील देवींच्या मंदिरात भाविक मोठी गर्दी करतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सव काळात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन घेण्याच्या तुमचा विचार आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
नवरात्रोत्सव काळात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग होणार आहे. 20 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. 200 रुपयांचा देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत 1000रुपये असणार आहे.
तसंच, स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आली. शिवाय सकाळच्या अभिषेक पासची संख्या तीनशेवरून चारशे करण्यात आली. तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून परिपत्रक काढून नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
दरम्यान, तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सव कालावधीत देवीचा छबिना मिरवणूक वाघ, सिंह, हत्ती घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते. त्याला रंगरंगोटी केली जात आहे. तुळजापुरातील पोतदार कुटुंबीय हे काम करतात. दोन पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जात आहे. तुळजापुरातील या तयारीचा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आढावा घेतला
तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला 14 सप्टेंबरपासून सुरुवात
श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून, ती नऊ रात्री पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल. महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीने घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. या महोत्सवाची कोजागरी पौर्णिमेला सांगता होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी 12 वाजता विधिवत घटस्थापना होईल. यानंतर 23,24,25 रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक निघणार आहे.